"उद्धव ठाकरेंमध्ये नाव घ्यायची हिंमत नाही, कारण त्यांना माहितीय की..."
By महेश गलांडे | Published: October 26, 2020 04:29 PM2020-10-26T16:29:09+5:302020-10-26T16:29:26+5:30
नाव न घेता उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका केली असं सगळे म्हणतात. नाव घ्यायची हिंमत त्यांच्यात नाही, त्यांना माहितीय चीरफाड होईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंना टीकेला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानं राणे बंधुंनी देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे पिता-पुत्रांवर प्रहार केला. तसेच, उद्धव ठाकरेंमध्ये नाव घ्यायची हिंमत नाही, असेही निलेश राणे म्हणाले.
नाव न घेता उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका केली असं सगळे म्हणतात. नाव घ्यायची हिंमत त्यांच्यात नाही, त्यांना माहितीय चीरफाड होईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंना टीकेला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली. मीही फावडा आणि पेंग्वीन म्हणू शकतो, महाराष्ट्राला माहितीय फावडा कोण अन् पेंग्वीन कोण. व्यासपीठावर जाऊन मीही काहीही बोलू शकतो, जर हे इथं थांबलं नाही तर मीही काहीही बोलेन. उद्धव ठाकरे ज्या भाषेत बोलले, त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देणार, असे निलेश राणे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंनी छताडावर पाय ठेऊन आडवे करू अशी भाषा वापरु नये, त्यांना ती शोभत नाही. किती केसेस उद्धव ठाकरेंच्या अंगावर आहेत, किती केसेस आदित्य ठाकरेंच्या अंगावर आहेत, पण शिवसैनिकांच्या अंगावर दहा-10 केसेस आहेत. कमकुवत आणि कमजोर लोकांच्या अंगावर जाण्याचं काम शिवसेना करते. नशिबानं ते मुख्यमंत्री पद मिळालंय, भीक मागून, सगळे विचार वगैरे बाजूला ठेऊन हे सरकार बनलेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काम करावं, कोरोना काळात महाराष्ट्र सरकारचं काम फेल ठरलंय. एखादं दुकानही चालवायचं उद्धव ठाकरेंना माहित नाही, ते आज सरकार चालवतायंत अशी घणाघाती टीकाही निलेश राणेंनी केली.
निलेश राणेंनी दिलं आव्हान
'नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा...,' असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलं आहे.