मुंबई- रमाकांत आचरेकर सरांचं निधन झाल्यानं क्रिकेटजगतामध्ये शोककळा पसरली. रमाकांत आचरेकर ही उत्तम क्रिकेटपटू घडवणारी व्यक्ती होती. ती एक भट्टी होती, त्यातून तावूनसुलाखून निघालेले अनेक तारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आकाशात आज चमकत आहेत. ते खऱ्या अर्थाने क्रिकेटचे भीष्माचार्य आणि क्रिकेटपटूंचे द्रोणाचार्य होते, असंही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.तसेच एवढ्या महान आचार्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप द्यायला राज्य सरकार विसरले. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्या सरकारने पद्मश्री आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. म्हणून आचरेकर सरांचे योगदान, महान कार्य कमी झालेले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले नाही. पुन्हा प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात कम्युनिकेशन गॅप राहिला अशी मखलाशी सरकारच्याच एका मंत्र्याने केली. हा प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच वेदनादायी आहे.- शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत म्हणून आचरेकर सरांचे योगदान, महान कार्य कमी झाले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले.- आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांच्याभोवती लोकप्रियता आणि प्रसिद्धीचे मोठे वलय असते, मात्र या क्रिकेटपटूंना घडविणाऱ्या त्यांच्या गुरूंना हे वलय, मानसन्मान फारसा मिळत नाही.- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखा विश्वविक्रमवीर क्रिकेटपटू त्यांनी हिंदुस्थानी आणि जागतिक क्रिकेटला दिला. त्याच्या रूपाने क्रिकेटचा देवच घडवला.- ते स्वतः एक प्रतिभावान रत्नपारखी आणि हाडाचे क्रिकेट प्रशिक्षक होते. त्यासाठी लागणारे उपजत गुण, खेळाडूंना उत्तम त-हेने घडविण्याचे कसब त्यांच्यात होते.- खेळाडूंमधील गुण आणि कौशल्य अचूक हेरून त्यानुसार त्याला विकसित करण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी स्वतः मेहनत घेण्याची आणि त्या खेळाडूलाही त्यापेक्षा जास्त परिश्रम करायला लावण्याची ताकद त्यांच्यात होती.- मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही आचरेकर सरांनी सरळ खेळायला शिकवले असे जेव्हा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच सांगतो तेव्हा रमाकांत आचरेकर या साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाविषयी कल्पना येते- चंद्रकांत पंडितसारख्या खेळाडूची क्रिकेटमधील गती पाहून त्याच्या वडिलांना भेटणारे, स्वतःच्या खिशातून एक हजार रुपये देणारे आचरेकरांसारखे प्रशिक्षक आजच्या जमान्यात वेडेच ठरविले जातील- पैसा आणि क्रिकेट प्रशिक्षण हा त्यांच्यासाठी विषयच नव्हता. अनेक गरीब युवा खेळाडूंसाठी ते देवच ठरले. ते स्वतः प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले खरे, पण त्यांची कारकीर्द गाजली ती क्रिकेट प्रशिक्षक म्हणून.- गुणग्राहकता, पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या अंगभूत गुणांचा, कौशल्याचा विकास करणे हे सर्व कठोर शिस्तीच्या परिघात करून घेत उत्तम क्रिकेटपटू घडविणे हीच आचरेकरांच्या जीवनाची वहिवाट राहिली.- सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटला पडलेले एक स्वप्न सत्यात आणून दाखविले. विनोद कांबळीसारखा विक्रमवीर आणि बलविंदरसिंग संधू, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, संजय बांगर, रमेश पोवार यांच्यासारखे अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविले.- सरावाच्या वेळी स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवून सचिनला ह्यनाबादह्ण फलंदाजी करण्याचे आव्हान देणारे आणि ते यशस्वीपणे पेलायला लावणारे आचरेकरांसारखे प्रशिक्षक विरळच.
आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 8:33 AM