मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षाचा व्हीप झुगारल्याप्रकरणी 16 आमदारांचे निलंबन करण्याची मागणी शिवसेनेनं केलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिंदेगटात गेलेले शिवसेनेचे आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह यशवंत जाधव यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.
उदय सामंत आणि यशवंत जाधव हे शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते. मात्र, शिवसेना पक्षात बंडखोरी करत या दोन्ही नेत्यांनी शिवसेने प्रमुख बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग घेतला. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर गद्दार आणि गुवाहटी म्हणत टिका करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे हेही सातत्याने गद्दार असे संबोधत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या या विधानावरुन उदय सामंत यांनी विधानसभेत भूमिका मांडताना शिवसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य केलं. तसेच, महाविकास आघाडीत सहभागी होणे हीच खरी गद्दारी असल्याचं नाव न घेता म्हटलं. त्यामुळे, अप्रत्यक्षपणे सामंत यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला होता. त्यानंतर, काही दिवसांतच शिवसेनेनं उदय सामंत यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे, शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष आणि पक्ष संघर्ष आणखीनच चिघळला जाण्याची शक्यता आहे.