महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:52 AM2024-11-28T08:52:45+5:302024-11-28T08:53:46+5:30
मुंबईतील ३५ नगरसेवकांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकांची रखडलेली निवडणूक होण्याची शक्यता
दीपक भातुसे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून २० जागांवर विजय मिळवणारे उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष एकत्र ठेवण्याचे आव्हान आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकत्रित असताना शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ४० आमदार ठाकरे यांना सोडून गेले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत २१ जागा लढवत उद्धवसेनेने ९ जागा जिंकल्या. मात्र, हे यश विधानसभा निवडणुकीत त्यांना टिकवता आले नाही.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकांची रखडलेली निवडणूक आता होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी जसे शिवसेनेचे आमदार आपल्याकडे खेचले तसेच त्यांनी मुंबई ठाण्यातील नगरसेवकांनाही गळाला लावले आहे.
मुंबईतील आमदार ही जमेची बाजू
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत उद्धवसेनेचे १० तर शिंदेसेनेचे ६ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदेंपेक्षा मुंबईत आमदार जास्त ही ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे. मात्र, हे आमदारही सत्तेच्या जोरावर आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला तर ठाकरेंसाठी पक्ष टिकवण्याचे आव्हान उभे राहू शकते.
मुंबईतील ३५ नगरसेवकांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
२०१७ सालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे ८५ नगरसेवक निवडून आले होते, तर मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे हा आकडा ९१ वर गेला होता. त्यातील आतापर्यंत ३५ नगरसेवक शिंदेंनी आपल्याकडे खेचले आहेत. याशिवाय मुंबईतील अनेक पदाधिकारीही ठाकरेंना सोडून शिंदेंबरोबर गेले आहेत.
पाच विधानसभा निवडणुकांतील निकाल
वर्ष पक्ष जिंकलेल्या जागा मतांची टक्केवारी
२००४ एकत्रित शिवसेना ६२ २०%
२००९ एकत्रित शिवसेना ४४ १६.३%
२०१४ एकत्रित शिवसेना ६३ १९.३%
२०१९ एकत्रित शिवसेना ५६ १६.४%
२०२४ उद्धवसेना २० १०%
२०२४ शिंदेसेना ५७ १२.३८%