आज दसरा मेळाव्यात नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया!, उद्धव ठाकरेंचा सामना संपादकीयमधून सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 07:50 AM2017-09-30T07:50:30+5:302017-09-30T07:52:17+5:30

राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना जरूर सहभागी आहे, पण जनतेच्या वेदनांवर किमान फुंकर घालण्याइतपतही सत्तेचा उपयोग नसेल व महागाईपासून बेरोजगारीपर्यंतच्या वणव्यात जनतेची होरपळ तशीच सुरू राहणार असेल तर सत्तेचा गळफास संवेदनशील नेत्यांचा श्वास गुदमरून टाकतो

Uddhav Thackeray faces editorial warning from today, to blow up the new war trumpet! | आज दसरा मेळाव्यात नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया!, उद्धव ठाकरेंचा सामना संपादकीयमधून सूचक इशारा

आज दसरा मेळाव्यात नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया!, उद्धव ठाकरेंचा सामना संपादकीयमधून सूचक इशारा

Next

मुंबई - शिवसेनेचा आज दसरा मेळावा असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान त्याआधी उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून एल्फिन्स्टनला झालेल्या चेंगराचेंगरीवरुन सरकारवर घणघणाती टीका केली आहे. आज नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया! असं आवाहन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचक इशाराही दिला आहे. राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना जरूर सहभागी आहे, पण जनतेच्या वेदनांवर किमान फुंकर घालण्याइतपतही सत्तेचा उपयोग नसेल व महागाईपासून बेरोजगारीपर्यंतच्या वणव्यात जनतेची होरपळ तशीच सुरू राहणार असेल तर सत्तेचा गळफास संवेदनशील नेत्यांचा श्वास गुदमरून टाकतो. सत्तेचे मालक आम्ही आज नसू, पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व रक्षणाचा मक्ता नक्कीच शिवसेनेच्या हाती आहे व राहणारच असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

अच्छे दिन येतील व घराघरांत सुखसमृद्धी नांदेल हे वचन तसे हवेतच विरले आहेत. रावणाची दहा तोंडे परवडली, पण आताचे एकतोंडी राक्षस शंभर बकासुरांना भारी पडत आहेत. त्यांचा बंदोबस्त करून महाराष्ट्रात भगव्याचे राज्य आणायचा संकल्प करूया. बुलेट ट्रेनची मस्ती ही एल्फिन्स्टनच्या पुलावर २२ निरपराध्यांचा प्राण घेऊनही शांत झाली नसेल तर त्या बुलेट मस्तीची नशा उतरवण्याचा विडा उचलूया. शिवसेनेने आपली शस्त्र शमीच्या झाडावर कधीच ठेवली नाहीत. म्हणून विचारांचा व लढायांचा खणखणाट महाराष्ट्रात सुरू असतो. आज नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

एका बाजूला पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री अहमदाबाद-मुंबई अशा बुलेट ट्रेनची तयारी करतात. महाराष्ट्राचे सरकार त्यासाठी ३० हजार कोटींची उचल देते. त्याचवेळी मुंबईतील रेल्वे दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू होतो यास काय म्हणावे? एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेमुळे मुंबईकरांच्या दसऱयाच्या आनंदात विष मिसळवण्याचे काम झाले आहे. बुलेट ट्रेन मुंबईकरांच्या काय कामाची? आमचे रेल्वे फलाट, रेल्वेचे पूल, रेल्वे रूळ, लोकल गाडय़ा सुधारा. तेथे रोजचेच मरण आहे. ते काय एका बुलेट ट्रेनने संपणार आहे? पण लोकांच्या प्रश्नांवर जाणिवेने काम करण्यापेक्षा फक्त झगमगाटाच्या‘छाः छूःगिरी’वरच भर दिला जात आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आहे. 

दस-याच्या पूर्वसंध्येस हे सर्व घडावे यासारखे दुर्दैव ते कोणते? सोने लुटायचे, गोडधोड खायचे ‘अच्छे दिन’ राज्यकर्त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे आले नसले तरी  कर्ज काढून सण साजरे करायचे. मुलाबाळांच्या आनंदात आपला आनंद मानायचा यासाठीच मुंबईचा चाकरमानी रोज घराबाहेर पडतो. पण जो बाहेर गेला तो संध्याकाळी घरी परत येईल काय, याच चिंतेत आईबाप, मुलं-बायका असतात. एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेत जे मरण पावले त्यांच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. पंतप्रधानांनी संवेदना वगैरे व्यक्त केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करतात तेव्हाही अशा संवेदना व्यक्त होत असतात. पण नवे सरकार तीन वर्षांपासून नेमके काय करीत आहे? लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान गेल्या साठेक वर्षांत फक्त घोषणांचाच पाऊस पाडत आले. सरकारे बदलली की जुन्याच घोषणांची नावे बदलून नव्या घोषणा केल्या जातात. राज्यकर्ते बदलले, पण जनता आहे तेथेच आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  

एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या दुःखद पार्श्वभूमीवर आजचा दसरा सण येत आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते आहे. राज्यकर्ते मंडळी घोषणांचे बुडबुडे हवेत सोडत असली तरी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत नाही, तर महाराष्ट्रहित व राष्ट्रहिताच्या दृष्टीने दिशादर्शक असे मार्गदर्शन येथे होत असते. ते या वेळीही अर्थातच होणार आहे. फालतू पोपटपंची करण्यासाठी शिवसेनेचे दसरा मेळावे होत नसतात असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

मुंबईची लूट सुरू आहे. फक्त दरोडेखोरांचे मुखवटे बदलले इतकेच. महाराष्ट्राची जनताही सुखाच्या शोधात आहे. अच्छे दिन येतील व घराघरांत सुखसमृद्धी नांदेल हे वचन तसे हवेतच विरले आहेत. लोकांचे रोजचे जगणे मरणासन्न झाले आहे. अर्थात, ही दैन्यावस्था बदलावीच लागेल आणि त्यासाठी आजच्या विजयादशमीला विचारांचे सोने लुटून नव्या विजयाचा संकल्प करावाच लागेल असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

Web Title: Uddhav Thackeray faces editorial warning from today, to blow up the new war trumpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.