...तर बाळासाहेब मला माफ करणार नाहीत; उद्धव ठाकरेंचं युतीबद्दल 'सूचक' विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 05:30 PM2018-06-19T17:30:00+5:302018-06-19T17:30:00+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपासोबतच सत्तेत राहण्याचे संकेत दिले आहेत, मात्र.......
मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून आम्ही राजकारणाचं बाळकडू घेतलंय. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडायचं की सोबत राहायचं, हे आम्हाला कुणी शिकवू नये, असं खडसावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपासोबतच सत्तेत राहण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्याचवेळी, तडजोडीचं राजकारण केलं तर बाळासाहेब मला माफ करणार नाहीत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी स्वबळाचा नाराही कायम ठेवला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा उचलून धरत त्यांनी विरोधकांच्या आघाडीत वगैरे जाण्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी 'सवयीप्रमाणे' केंद्रातील नरेंद्र सरकार आणि राज्यातील देवेंद्र सरकारला लक्ष्य केलं, पण 'नेहमीप्रमाणे' सत्तेतून बाहेर पडण्याची वगैरे घोषणा केली नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले,
>> गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही. अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत.
>> देव-देश-धर्म संभाजी महाराजांनी कधी सोडले नाही.
>> फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व.
>> ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो.
>> आपली ताकद वाढली आहे, म्हणून विविध लोक आपल्याला बोलवत आहेत.
>> भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन.
>> मोदींनी थापा मारून सरकार आणलं.
>> महाराष्ट्रात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करणारच. जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल.