Join us

Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Shivsena Melava: "शांत आहोत तर शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका"; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना 'वॉर्निंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 8:46 PM

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा घेतला खरपूस समाचार

Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Shivsena Melava: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या शिवतीर्थावरील भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची चर्चा सुरू होती. आज दादरच्या शिवाजी पार्कवर असलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारने शिवसैनिकांना त्रास देऊ नये. जोपर्यंत शिवसैनिक शांत आहेत तोपर्यंत राहू द्या, पिसाळायला लावू नका, असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपाला दिला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"शिवसेनेचा वाघ आनंद दिघे हे कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. जातानाही ते भगव्यातून गेले. त्यांनी भगवा कधीही सोडला नाही. आता राज्य सरकारमधील काही लोक जाणूनबुजून आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहेत. पण मी आधीच सांगून ठेवतोय, जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल, तर खपवून घेणार नाही. तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही," अशी 'वॉर्निंग' उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

तर मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन!

शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलला की निघून जा, तर मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन. सभेनंतर परंपरेनुसार रावण दहन करणार आहोत. यावेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आत्तापर्यंत दहा तोंडाचा होता. आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे. हॉस्पिटलमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही असा साऱ्यांचा प्रयत्न होता, पण त्यांना कल्पना नव्हती की उद्धव ठाकरे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, शाप आहे," अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

टॅग्स :दसराएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना