'उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 06:55 PM2019-06-07T18:55:12+5:302019-06-07T18:56:30+5:30
उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या अयोध्या दौऱ्याची गरज नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. याअगोदर सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता.
उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या अयोध्या दौऱ्याची गरज नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिराची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायदा हातात न घेता, राम मंदिर बांधणे ही सरकारची भूमिका आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असून उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे आठवलेंनी म्हटले आहे.