'इंडिया'च्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषणासाठी ५ मिनिटंच मिळाली, कारण...; शिंदेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:26 PM2024-03-18T16:26:34+5:302024-03-18T16:31:30+5:30
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच आम्हाला त्यांना सोडावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
CM Eknath Shinde ( Marathi News ) : मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची काल जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला आहे. "आमदार, खासदार आणि शिवसैनिक सोबत राहिले नसल्याने उद्धव ठाकरेंची पत तेवढीच राहिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांना भाषण करण्यासाठी फक्त पाच मिनिटे देण्यात आली," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "कालची सभा ही एक फॅमिली गॅदरिंग होतं. सगळे नैराश्य असणारे लोक...कोणी उत्तर प्रदेशातून, कोणी बिहारमधून तर कोणी जम्मू-काश्मिरातून तिथं आलं होतं. ज्या लोकांना तेथील लोकांनी तडीपार केलं आहे ते लोक इथं आले होते. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत हिंदू बांधवांनो शब्द वापरला नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणायला आधीच त्यांची जीभ कचरत होती, आता हिंदू बांधवांनो हा शब्दही गाळण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच आम्हाला त्यांना सोडावं लागेल," अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
"विरोधकांच्या भाषणात फक्त मोदीद्वेष"
सरकारच्या कामाविषयी माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, "आमच्या आधीचं सरकार विकासविरोधी होतं. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्पांना गती दिली. आज केंद्र आणि राज्याच्या डबल इंजिन सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटकांसाठी आपण विविध योजना राबवल्या. दोन वर्षांत महायुती सरकारने केलेले काम सर्वांसमोर आहे. सरकारने केलेल्या कामात मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं खूप मोठं योगदान आहे. सरकारच्या कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. आम्ही कोणावर टीका-टिपण्णी करण्यापेक्षा कामावर लक्ष देतो. राज्यात खूप मोठी परदेशी गुंतवणूक आली आहे. या सगळ्या कामाचा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल. देशात विश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. विरोधकांच्या भाषणात फक्त मोदीद्वेष पाहायला मिळाला."
दरम्यान, "हिंदू धर्मातील शक्तीबद्दल काल राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदू धर्मात नारीशक्ती आहे, साडेतीन शक्तीपीठं आहेत, राहुल गांधी हे सगळं संपवणार आहेत का?" असा सवालही एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.