राज्यात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटत यांच्यात पक्षाच्या नावावरून आणि निवडणूक चिन्हावरून जोरदार संघर्ष सुरू होता. मात्र, या मुद्द्यावर आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)', असे नाव दिले असून मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव देण्यात आले आहे. तसेच, शिंदे गटाने दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाने बाद ठरवत उद्या दुपारपर्यंत, नव्याने 3 पर्याय देण्यास सांगितले आहे. यातच, ठाकरे गटाला नवे नाव आणि नवे चिन्ह मिळाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी खास अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "एक गाणं आहे. खरं तर, ते गाणं वेगळं आहे. काळरात्र होता होता, उष:काल झाला. अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्षाचे नाव मिळाले आहे. खरी पहिली लढाई जिंकली.''
"आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून, प्रत्येक घराघरात मशाल हे चिन्ह, जे देवीच्या, देवदेवतांच्या ठिकाणी लावून उजेड केला जातो. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याची ठरवली. तो उष:काल आता सुरू झाला आहे. आता पेटवा आयुष्याच्या मशाली आणि दाखवा ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे," असेही पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
आम्हाला लोकांच्या मनातलं नाव मिळालं -निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना असंच आम्हाला नाव पाहिजे होतं आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. याच नावाने आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हाला मिळालं आहे, असं भरत गोगावले म्हणाले. तसेच आत कोणतंही चिन्हं मिळालं तरी हरकत नाही, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.