मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सेनेतील बंडाचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना फोटो चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे.
लोकसभा संसद भवन येथील शिवसेना कार्यालयातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो चोरीला गेल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्यात यावी, तसेच फोटो पुन्हा कार्यालयात लावण्यात यावेत अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
पत्रात काय म्हटले आहे?
शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालय 128, तिसरा मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे आहे. लोकसभा सचिवालयाने हे कार्यालय शिवसेना संसदीय पक्षाला लोकसभा आणि राज्यसभेत काम करण्यासाठी कार्यालय म्हणून दिले आहे. मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आमच्या संसदीय पक्ष कार्यालयात शिवसेना संस्थापक आणि प्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. यात आता उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो फेब्रुवारी 2023 मध्ये चोरीला गेले आहेत. त्यामुळे आपणास विनंती आहे की, त्याकडे लक्ष द्यावे, आणि फोटो पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी या पत्रात केली आहे.