"ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे जिवंत होते..."; कदम-किर्तीकर वादावर ठाकरे गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 07:42 PM2023-11-13T19:42:13+5:302023-11-13T19:42:54+5:30
तुम्ही एकत्र या, आमच्याशी लढा. परंतु अमोल किर्तीकर यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे असं आव्हान अनिल परबांनी दिले आहे.
मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातील वादावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात या वादावरून ठाकरे गटानं दोन्ही नेत्यांना शरसंधान साधले आहे. जेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, त्यावेळी हे नेते एकमेकांना पाडत होते याचा खुलासा आता तेच स्वत: करतायेत, म्हणजे तेव्हापासून गद्दारी करतायेत हे स्पष्ट होते असा टोला ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी लगावला आहे.
अनिल परब म्हणाले की, रामदास कदम, गजानन किर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे गेले, आज हे दोन्ही नेते एकमेकांच्या गद्दारीचा पाढा वाचत आहेत. कोण मोठा गद्दार आहे असा वाद आहे. परंतु हे दोघे अशा घटनांचा उल्लेख करतायेत जेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. एकीकडे तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणून तिकडे गेलात असं म्हणता, परंतु जेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तेव्हापासून तुम्ही गद्दारी करतायेत हे स्पष्ट होते. आज आम्ही गद्दार म्हटल्यावर राग येतो. पण हे आज त्यावेळचे वाभाडे काढतायेत. पण ज्या जागेवरून ते भांडतायेत ती जागा भाजपा स्वत:कडे घेणार असा दावा त्यांनी केला.
तसेच भाजपा यांना कुठलीही जागा देणार नाही. या निवडणुकीत भाजपा उमेदवार उतरवेल. तुम्ही दोघे एकत्र येऊन आमच्याशी लढा. अमोल किर्तीकर हे आमचे उमेदवार असतील असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही एकत्र या, आमच्याशी लढा. परंतु अमोल किर्तीकर यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे. आम्ही १०० टक्के अमोल किर्तीकरांना निवडून आणू. गजाभाऊंच्या विजयात माझा वाटा आहे. मीदेखील अहोरात्र कष्ट केलेत. आम्ही मतांची भीक मागितली आहे. प्रचंड कष्ट घेतलेत. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. जे आमचा उमेदवार लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. उद्या ही जागा भाजपाने घेतली तर कुणीही त्यांना जाब विचारू शकत नाही असंही अनिल परब यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ज्यावेळी नारायण राणे शिवसेनेतून जात होते तेव्हा रामदास कदम यांचेही नाव त्या यादीत होते. विरोधी पक्षनेते केले म्हणून ते इकडे थांबले, अन्यथा ते तिकडे गेले असते. रामदास कदमांच्या निष्ठेचे किस्से आम्ही बऱ्याचदा ऐकलेले आहेत. पडताळून पाहिले आहेत. निष्ठा वैगेरे त्यांनी शिकवायाची गरज नाही. त्यांच्याच पक्षातील लोक एकमेकांचा गळा दाबतायेत, आमच्यासाठी अल्हाददायक चित्र आहेत. बाळासाहेबांनी हेच संस्कार केलेत का? बाळासाहेब असते तर बोलण्याची हिंमत होती का? बाळासाहेबांनी कधी असे विचार दिले नाही. खुर्चीचे राजकारण आहे. निष्ठा वैगेरे मोजल्या जात नाही. आपली मुलं कसं सेटल होतील याचा प्रयत्न रामदास कदमांनी करत आहेत. सिद्धेश कदमांनी यावेच, त्यांची जागा कुठे आहे हे दाखवून देऊ असा इशारा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिला आहे.