मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज-शिंदे यांची भेट त्याला आम्ही काय करणार? सदू आणि मदू भेटले. जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आले असेल अशा शब्दात राऊतांनी भेटीचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली त्यावर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सदू आणि मदू भेटले. बालभारतीत आम्हाला हा धडा होता. ते जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आले असेल. मालेगावात उद्धव ठाकरेंची जी विराट सभा झाली त्यामुळे त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील. त्याला मी काय करू. आम्ही आमचे काम करतोय असं त्यांनी म्हटलं.
सावरकर हा आमचा श्रद्धेचा विषयवीर सावरकर यांच्याबाबतीत आम्ही सातत्याने आमची भूमिका स्पष्ट केलीय. राहुल गांधींशी याबाबत चर्चाही झाली. ज्येष्ठ नेत्यांशीही बोलणे झाले. सावरकर हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना विचारा, सावरकरांचा अपमान, माफीवीर म्हणणे हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेऊन लढाईला उतरलो आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली असंही संजय राऊतांनी म्हटलं.
नार्कोटेस्ट कुणाची करणार हे स्पष्ट झालेआमचा पक्ष मालेगावच्या विराट सभेत दिसला. ज्यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप लावला त्यांचेच मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू राहू द्या. ज्यांच्या कांद्याला ५० खोके भाव मिळाला आणि कांदे उत्पादक शेतकरी रडतोय. काल मालेगावच्या सभेने भविष्यात जनता कुणाची नार्कोटेस्ट करणार हे स्पष्ट झाले. कुठल्याही फालतू लोकांच्या आरोपावर उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नाही असं सांगत आमदार सुहास कांदे यांच्या आरोपावर संजय राऊतांनी भाष्य करणे टाळले.
मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाहीमुख्यमंत्र्यांना काहीच काम नाही. वेगवेगळ्या दिशांना सभा घेण्याचा छंद जडला आहे. दुसरे काम नाही. राज्यकारभार नीट करा, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार महाराष्ट्रात ज्यारितीने जगतोय ते समजून घ्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढतायेत हे समजून घ्या असा टोला संजय राऊतांनी लगावला.