Join us

उद्धव ठाकरे गटाच्या सुधीर मोरेंचा संशयास्पद मृत्यू; घाटकोपर रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 11:02 AM

मुंबईतील कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख

Sudhir More Death: मुंबईतील कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. घाटकोपररेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह सापडला. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार गुरूवारी रात्री कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मोरे यांनी घाटकोपर आणि विद्याविहार या रेल्वे स्टेशन्सच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांना काही लोक ब्लॅकमेल करत असल्याचा संशय निकटवर्तीयांकडून व्यक्त केला गेला आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (Uddhav Thackeray Shivsena)

ब्लॅकमेलिंगचे प्रकरण?

या आत्महत्येच्या मागे नक्की काय कारण आहे याबाबत पोलिस धागेदोरे शोधावे लागतील. गेल्या काही महिन्यांपासून मोरेंना कोणीतरी ब्लॅकमेल करत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या भावाला आणि निकटवर्तीयांना याबाबत कल्पना दिली होती. तसेच कॉल रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा मोबाईल फोनदेखील मागितला होता. त्यामुळे आता सुधीर मोरेंचे निकटवर्तीय यांनी पोलिसांनी विनंती केली आहे की त्यांनी कॉल रेकॉर्ड्स आणि रेकॉर्डिंग तपासून पाहावे. त्यातून कदाचित काही कारण सापडू शकते, असा संशय निकटवर्तीयांकडून व्यक्त होत आहे.

सुधीर यांनी लोको दोस्त नावाची संघटना स्थापन केली होती. त्यातूनच त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला होता. अरुण गवळी यांच्या पक्षातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंतर पार्क साइट वॉर्ड क्रमांक 123 ही आरक्षित जागा झाल्यावर कुणबी समाजाचे काशिनाथ धरळी यांना रिंगणात उतरवले गेले. तेथे ते मोठ्या फरकाने विजयी झाले. धरळीनंतर महिलांची जागा असताना सुधीर मोरे यांनी डॉ. सुबोध बावधने यांच्या पत्नी भारती बावधने यांना तिकीट देऊन विजय निश्चित केला.

2017-18 मध्ये पुन्हा एकदा महिलांच्या जागा आरक्षित झाल्या. त्यानंतर सुधीर मोरे यांनी त्यांचे लहान भाऊ सुनील मोरे यांच्या पत्नी स्नेहल मोरे यांच्यासाठी मातोश्रीमध्ये तिकीट मागितले, मात्र मातोश्रीने सुधीर मोरे यांच्या धाकट्या सुनेला तिकीट न देता विद्यमान नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनाच तिकीट दिले. त्यानंतर सुधीर मोरे यांनी शिवसेने विरोधात बंडखोरी केली आणि भावाची पत्नी स्नेहल हिला अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी केले. काही दिवसांनी मातोश्रीवरून फोन आला आणि सुधीर मोरे यांनी नाराजी विसरून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे रत्नागिरीच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाघाटकोपररेल्वे