मुंबई : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भाजपकडून केला जात होता. आता याच कामांचे कॅगमार्फत विशेष लेखापरीक्षण केले जाणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील मागील दोन वर्षांच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा प्रस्ताव कॅगला पाठवला होता.
कॅगने हे लेखापरीक्षण करण्याचे मान्य केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे लेखापरीक्षण होणार असल्याने यामुळे शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे गट हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. कोरोनाकाळात लोकांना तातडीने वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात आणि उपचार मिळावेत यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता कोरोना केंद्र उभारणे, विविध वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्याची खरेदी करणे याला प्राधान्य देण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. विधानसभेतही भाजपच्या आमदारांनी कोरोनाकाळातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले होते. भाजपच्या आमदारांनी केलेल्या या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणाही केली होती.
या कामांचे होणार विशेष लेखापरीक्षण
- मुंबई महापालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विविध दहा विभागांमध्ये करण्यात आलेल्या १२ हजार २३ कोटी ८८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.
- कोरोनाकाळात विविध ३,५३८ कोटी रुपयांची विविध कामे
- तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली ९०४ कोटींची खरेदी
- दहिसर येथील अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची ३३९ कोटी रुपयांना केलेली खरेदी
- चार पुलांच्या बांधकामावर झालेला १,४९६ कोटींचा खर्च
- मुंबईतील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीवर झालेला २,२८६ कोटींचा खर्च
- सहा सांडपाणी प्रकल्पांवर झालेला १,०८४ कोटी रुपयांचा खर्च
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर केलेला १,०२० कोटी रुपयांचा खर्च
- तीन मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी करण्यात आलेला १,१८७ कोटी रुपयांचा खर्च
मुंबई महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाप्रकरणी होणारी कॅगची चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जाणार नाही. ही चौकशी निष्पक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
कोविडकाळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे मोठे कौतुक करण्यात आले आहे. मात्र, कॅगला जर आक्षेपार्ह वाटले असेल तर चौकशी व्हावी. आयुक्त, प्रशासनाने चौकशीला सामोरे जावे. कॅगने केलेल्या चौकशीची माहिती सर्व माजी नगरसेवकांना द्यावी, अशी मागणी करणारे पत्र आपण पालिका आयुक्तांना देणार आहे.- किशोरी पेडणेकर, माजी महापौर, मुंबई
मुंबई महापालिकेतील कामाच्या चौकशीचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भाजप स्वतः भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून, आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपला खरोखरच भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर दोन वर्षांची का? मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस