उद्धव ठाकरेंना याची कल्पना होतीच; प्रत्येक खासदारावर दबाव, विनायक राऊतांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:42 PM2022-07-18T20:42:33+5:302022-07-18T22:43:00+5:30
शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० आमदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे. लोकसभेतील १९ पैकी १४ खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले की, हे होणार होतं याची कल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती. प्रत्येक खासदारावर दबाव टाकण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीची आमिषं दाखवण्यात आली. वेगवेगळ्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडे खेचून घ्यायचं, अशा प्रकारची कपटनीती या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांसोबत खेळली जात होती. दुर्दैवाने त्याला ते बळी पडले आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
दरम्यान, शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. अनेकांनी फुटून जाणून गट निर्माण केला असेल, त्यांना कोणताही अधिकार राहिला नाही. या सर्वाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोकसभेमध्ये वेगळा गट तयार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेवर फरक पडणार नाही- संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेतेपद बाळासाहेबांनी तयार केले आहे. तसेच शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना आमची कार्यकारणी बरखास्त करण्याची अधिकार नाही. याचा शिवसेनेवर फरक पडणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारीणी घोषित करू शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.