उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखपद जनतेनं बहाल केलंय, शिवसेना कागदी वाघ नाही - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:22 PM2023-01-23T19:22:41+5:302023-01-23T19:23:09+5:30
शिवसेनेने सातत्याने हे रक्त सांडले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही असं राऊत म्हणाले.
मुंबई - निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाही. पक्षप्रमुखपद हे जनतेने बहाल केले आहे. शिवसेना ही धगधगती संघटना आहे. रक्तातून निर्माण झालेला शिवसेनेचा इतिहास आहे तो कुठल्याही शाईने मिटवता येणार नाही. शिवसेनेचा इतिहास काय आहे हे अनुभवायचं असेल तर ती मोदींची शिवसेना निर्माण झालीय त्यांनी महाराष्ट्राच्या सीमापार करून पाहाव्यात असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, हल्ली देवांच्या मूर्तीही चोरायला लागल्या. पण देवाची मूर्ती चोरणारे मंदिर उभारत नाही. तर ते विकतात. हे चोर आहेत. दुर्लक्ष करा. ते आले तसे नष्ट होतील. पावसाळ्यात गांडुळ येतात. त्यानंतर त्यांचे अस्तित्व संपते. संपूर्ण देशात शिवसेना म्हटलं की आजही उद्धव ठाकरे समोर येतात. जो उत्साह आज दिसतोय हे शिवसेनेचे भविष्य आहे. आज आपल्या तीन चाकी रिक्षाला प्रकाश आंबेडकरांचे चौथे चाक लागले आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मुख्यमंत्री दावोसला गेले, तिथे महाराष्ट्राचं गुंतवणुकीचं कार्यालय केले. मुख्यमंत्री बसले होते. इतर फंटरही होते. तिथे २-४ गोरे लोक आले. अचानक घुसले हे गडबडले त्यांच्याशी बोलायचं काय? मग ते कुठल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले अरे, तुम्हीच हे, किती खोके देऊ तुम्हाला येता आमच्या पक्षात? नाही नाही मला खोके नको मी मोदींचा माणूस. आम्हीही मोदींची माणसे. मग त्यांनी सेल्फी काढला. हा फोटो मोदींना दाखवा म्हटलं. षण्मुखानंद हॉलमध्ये येताना ४ गोरे दिसले. ते मला बोलले मी पोलंडचा पंतप्रधान, बेल्झियमचा पंतप्रधान आहे. आम्ही उद्धव ठाकरेंची माणसं आहोत असे ते बोलले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकायला आले. अशा गमंतीजमंती महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत असं सांगत राऊतांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली.
दरम्यान, आज शिवसेनाप्रमुख असते तर ९७ वर्षांचे असते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही जन्म आज झाला. हे दोन महान युगपुरुष देशात जन्माला आले. देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर रक्त द्यावे लागेल. शिवसेनेने सातत्याने हे रक्त सांडले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही. शिवसेनेला संपवण्याचं, मिटवण्याचं नष्ट करण्याचं कारस्थान सुरू आहे. त्या सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना ज्या उद्दात्त हेतून बाळासाहेबांनी उभी केली. तो पक्ष कुणालाही तोडता येणार नाही असंही राऊतांनी बजावलं.
आजन्म बाळासाहेबांचे ऋणी राहू
भारत जोडो यात्रेत मी जम्मू काश्मीरात गेलो होतो. तिथे काश्मीरी पंडित गेल्या ६ महिन्यापासून धरणे आंदोलनाला बसलेत. हजारो काश्मीरी पंडीत घरदार सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहतायेत. सरकार त्यांच्यामागे तगादा लावतेय तुम्ही काश्मीरला जा. पण काश्मीरमध्ये पंडितांचे टार्गेट किलिंग होतेय. जोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही तोवर आम्हाला काश्मीरला पाठवू नका अशी त्यांची मागणी आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणवणारे काश्मिरी पंडितांचा बळी दिला. मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे अमर रहे या घोषणा दिल्या गेल्या. काही तरूण निवेदन मराठीत करू लागले. बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने आम्हा काश्मीरी पंडितांच्या मुलांना पुणे-मुंबईत शिकता आले असं त्यांचे विधान होते. आम्ही आजन्म बाळासाहेबांचे ऋणी राहू असं तरूण म्हणाले. या हिंदुत्वाचा तुम्ही सामना कसा करणार? असंही संजय राऊत म्हणाले.