"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:18 IST2025-03-27T13:11:18+5:302025-03-27T13:18:48+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Uddhav Thackeray: गेले २५ दिवस सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट बुधवारी झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दुसरीकडे, नागपुरात झालेला हिंसाचार आणि कुणाल कामरा प्रकरणावरुन हे अधिवेशन चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळालं. यावरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनात देशाला उत्तम गाणं मिळाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात अर्थसंकल्पातल्या घोषणांमध्ये सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं, त्यातून केवळ सत्ताधाऱ्यांच्या पाशवी बहुमताचा माज दिसला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी कुणाल कामराच्या गाण्यावरुन सुरु असलेल्या वादावरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. धिवेशन काळात देशाला चांगलं गाणं मिळालं, तेवढच काय ते फलित, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"जयंत पाटील यांनी काल म्हटलं की या अधिवेशनाचे फलित काय? या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला उत्तम गाणं दिलं हे आपल्याला मान्य करावं लागेल. हे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येकाच्या मनात गुणगुणलं जातंय. हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारं होतं बाकी काहीच नाही. असं अधिवेशन का घेतलं आणि त्यातून आपण काय दिलं असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर झाला. थापा रुपाने ज्या गोष्टी मारल्या त्याची वाच्यता कुणीही केली नाही. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. अधिवेशनातून सत्ताधाऱ्यांचा केवळ माज दिसला. या पूर्वी कधीही विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात हे सांगितलं असं कधी घडलं नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.