'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 01:19 PM2024-04-21T13:19:35+5:302024-04-21T13:21:29+5:30
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये शिवसेनेच्या मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने गाण्यातील तो शब्द हटवण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. याबाबत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे नोटीस धुडकावली आहे.
आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्या व्हिडीचा पुरावा देत निवडणूक आयोगाला सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे, असं सांगत ठाकरेंनी शाह आणि मोदींचा व्हिडीओ दाखवला. निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाह यांच्यावर कारवाई का नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.
"गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा या निवडणुकीवेळी आम्ही निवडणूक आयोगाला एका व्हिडीओची विचारणा केली होती. या व्हिडीओत आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे, या नोटीसमध्ये गाण्यातील तो शब्द हटवण्यास सांगितला आहे. आम्ही हा शब्द हटवणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी, शाह यांच्यावर कारवाई करा
उद्धव ठाकरे म्हणाले, भवानी माता सर्व जनतेची माता आहे. तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.