ठाणेः भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एवढी दोन तास काय चर्चा झाली असेल, यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना, उद्धव यांनी शहांना युतीसाठी एक प्रस्ताव दिल्याची खात्रीलायक माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे. ज्या फॉर्म्युल्यावरून २०१४ मध्ये युती तुटली होती, त्याच फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम असल्याचं समजतं आणि त्यातून उद्धव यांचं पुत्रप्रेम - आदित्यप्रेम पुन्हा स्पष्ट होतं.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी 'मिशन १५१'चा नारा दिला होता. स्वाभाविकच, शिवसेना शेवटपर्यंत १५१ जागांवर ठाम राहिली होती. भाजपाने दिलेला १४७ जागांचा प्रस्तावही त्यांनी धुडकावला होता. त्यामुळे हे 'मिशन'च युती तुटण्याचं कारण ठरल्याचा दावा भाजपाने केला होता. परंतु, आता पुन्हा तोच १५१ हा आकडा युतीत वाकडा येण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभेच्या निवडणुकीत १५१ पेक्षा एक तरी जागा जास्त देणार असाल, तरच युतीसाठी तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनीअमित शहांनी निक्षून सांगितल्याचं कळतं.
कर्नाटक विधानसभेनंतर होत असलेली विरोधकांची एकी पाहून, अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केलं आहे. त्या अंतर्गत ते बुधवारी मुंबईत आले होते आणि संध्याकाळी 'मातोश्री'वर गेले होते. अमित शहा - उद्धव ठाकरे भेटीकडे राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या, सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर जाहीर टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचं भवितव्य या भेटीवर अवलंबून असल्याचं जाणकार सांगत होते. तसं असेल तर, युतीचं भवितव्य कठीण आहे, असंच म्हणावं लागेल. कारण, आदित्य ठाकरेंचा 'मिशन १५१'चा नारा घेऊनच उद्धव ठाकरे पुढे जाताना दिसताहेत.
अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडेही मातोश्रीवर गेले होते. त्यांनी उद्धव आणि आदित्य यांच्यासोबत एकत्र चर्चा केलीच, पण त्यानंतर उद्धव - अमित शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनं युतीतील तणाव काही प्रमाणात निवळला आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. सुरुवातीला दोघांच्याही बोलण्याचा सूर आक्रमक होता, पण एकंदर चर्चा सकारात्मक झाली होती. उद्धव आणि आदित्य अगदी 'मातोश्री'च्या प्रवेशद्वारापर्यंत अमित शहांना सोडायलाही आले होते. परंतु, हे सगळं आगतस्वागत, आदरातिथ्य उत्तम झालं असलं, तरी 'मिशन १५१' मुळे पुन्हा घोळ होण्याचीच शक्यता आहे.