मुंबई - राज्यातील लॉकडाउन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे, मात्र अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे. मात्र, अद्यापही मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, कोरोनावर मात करत नेमकं कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपम मिशन बिगेन अगेन सुरु केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात प्रशासन आणि सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केलं. तसेच, कमीत कमी जिवितहानी आणि जनावरांची जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरल्याचे सांगितले. येत्या, 1 तारखेला आषाढी एकादशी असून राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे, त्याबद्दल सर्व डॉक्टरांचे अभिनंदन आणि आभारही मी मानत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.