उद्धव ठाकरेंनी सुरू केली BMC निवडणुकीची तयारी! कोणत्या मुद्द्यापासून सुरूवात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:48 IST2024-12-26T19:46:55+5:302024-12-26T19:48:52+5:30
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सुरू केली BMC निवडणुकीची तयारी! कोणत्या मुद्द्यापासून सुरूवात?
Uddhav Thackeray BMC Election : विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या होत्या. आता उद्धव ठाकरे तीन दिवस आढावा घेणार असून, गुरुवारपासून (२६ डिसेंबर) सुरूवात केली आहे.
पीटीआयने उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केले आहे. मुंबईत सध्या शिवसेनेची (यूबीटी) स्थिती काय आहे, किती ताकद आहे, याचा आढावा उद्धव ठाकरेंकडून घेतला जाणार आहे.
गुरुवापासून उद्धव ठाकरे यांनी आढावा घेण्यास सुरूवात केली असून, पुढील तीन दिवस ते सगळ्या प्रभागांचा आढावा घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेनेच्या (यूबीटी) माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन-तीन मुद्द्यांवर भर दिला होता. यात हिंदूत्वाचा मुद्दाही होता. लोकांपर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा पोहोचवा असे त्यांनी सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत जबर फटका बसला. मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईतील ३६ पैकी २१ जागा शिवसेनेने (यूबीटी) लढवल्या होत्या. पण, १० जागांवरच विजय मिळाला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने ठाकरे सावध झाल्याचे दिसत असून, विधानसभा निवडणुकीतील मुद्दे आणि मुंबई महापालिका निवडणूक या अनुषंगाने कामाला लागले आहेत.