Uddhav Thackeray: 'हिटलरही असाच अहंकारी होता', भाजपने कार्टुनद्वारे मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:42 PM2022-04-26T17:42:43+5:302022-04-26T18:00:42+5:30
Uddhav Thackeray:मुंबईत मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने घातला होता
मुंबई - राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. त्यातच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण हे वेगळ्याच वळणाला गेल्याचं दिसून येत आहे. हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका मनसेनं घेतल्यानंतर इतर नेतेही या जयजयकारात अग्रभागी झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत चक्क हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती. त्यातच, राणा विरुद्ध शिवसेना संघर्षही पाहायला मिळाला.
मुंबईत मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने घातला होता. त्यावरुन, मुंबईत चांगलाचा संघर्ष चिघळला होता. राणा दाम्पत्यास भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही करण्यात आला. तर, राणा दाम्पत्यास अटक झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांचे तुरुंगात हाल झाल्याचे म्हटले. दरम्यान, राणा दाम्पत्यास भेटण्यासाठी गेलेल्या खासदार किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावरुन, राज्यातील भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. आमचं हिंदुत्त्व हे घंटा बडवणारं नसून दहशतवाद्यांना बडवणारं असल्याचं त्यांनी म्हटलं. एकूणच भाजप नेते विरुद्ध शिवसेना नेते दररोज एकमेकांवर प्रखर शब्दात टिका करत आहेत. आता, भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख थेट हिटरलरशी केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र दिसून येत आहे. तसेच, हिटरलरही असाच अहंकारी होता, असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा इगो नावाचा फुगा अगदी आकाशाला भिडला तरी हरकत नाही, पण 2024 ला एवढ्याशा टाचणीने धडामकन् फुटने एवढी नक्की..! असेही भाजपने म्हटले आहे. व्यंगचित्रात मतदारांच्या हाती टाचणी दिसून येते.
हिटलर ही असाच अहंकारी होता!#HitlerThackeraypic.twitter.com/zWYOOejv8s
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 26, 2022
दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवरील हल्ला, मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यामुळे भाजप नेते शिवसेना आणि राज्य सरकावर आरोप करत आहेत. पोलिसांना हाताशी धरुन, पोलिसांचा गैरवापर करुन कायदा व सुव्यव्था बिघडत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. त्यातूनच, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करण्यात येत आहे.