मुंबई : धारावी पुनर्विकासात अदानी समुहाला सरकारकडून फायदा पोहोचवला जात असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने धारावीतील टी जंक्शन ते बीकेसी असा मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदानी समुहासह केंद्र आणि राज्यातील सरकारवर टीकेचे बाण सोडले. तसंच २०१८ मधील एखाद्या निर्णयावरून तुम्ही आमच्यावर टीका करत असाल तर ते पाप तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय विरोधकांवर केला आहे.
"धारावीचा गळा घोटणारा जीआर आम्ही कधीच काढला नाही. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकट आलंय, त्या त्या वेळी प्रथम शिवसैनिकच धावून येतो. मी मुख्यमंत्री असताना एकतरी निर्णय असा सांगा, जो मी माझ्या नागरिकांच्या हिताला बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी घेतला आहे. हा इशारा मोर्चा आहे. या मोर्च्याचा आवाज त्यांचे चेलेचपाटे, दलाल, सुपारीबाजांच्या कानापर्यंत पोहचला तर कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही. गुजरातला पळवलेलं दुसरं आर्थिक केंद्र, मला माझ्या धारावीत हवंय," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधात हल्लाबोल केला.
"मुंबईला हात लावाल तर याद राखा"
"मुंबईला ठेचून सगळं काही गुजरातला न्यायचं हा त्यांचा डाव आहे. पोलीस बांधवांनो, सरकार येतं आणि जातं पण तुमचा रेकॉर्ड खराब करून घेऊ नका. जिथल्या तिथे धारावीकरांना घर मिळालं पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही. ही मुंबई आम्ही कमावलेली आहे. तुमच्याकडे ऑफिस असेल, पण ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत. रस्त्यावरची ताकद काय आहे हे दाखवून देऊ. आमच्या मुंबईला हात लावाल तर याद राखा," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून विकासकामांना विरोध केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही कुठं विरोध करतोय? आमची मागणी एवढीच की, धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. विकास म्हणून धारावी अदानीच्या घशात घालताय, त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार? त्यांना ५०० फूट जागेचं घर मिळालंच पाहिजे. सूटबूट की सरकार आहे! सूट तुम्हाला आणि बूट आम्हाला असं जर केलंत तर बूट काय असतो हे धारावीची जनता तुम्हाला दाखवून देईल," असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.