मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झाला आहे. पहिल्या भागात त्यांनी भाजपा आणि बंडखोरांवर जबरी टीका केली होती. त्यानंतर, दुसऱ्या भागातही त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. तसेच, गद्दार या शब्दाबद्दलही उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, शिवसेनेकडून त्यांच्यासह बंडखोर आमदार-खासदारांना गद्दार असे संबोधले जात आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आपल्या प्रत्येक सभेत बंडखोरांचा उल्लेख गद्दार असाच करताना दिसन येते. राज्यात सर्कस सुरु झालं आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची हिंमत असेल तर द्या आणि पुन्हा निवडून या, असं आव्हानही त्यांनी बंडखोरांना दिलं आहे. तर, आदित्य यांनी गद्दार असा शब्दप्रयोग करू नये, अशी भावना बंडखोर आमदारांची आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुलाखतीत प्रश्न विचारला होता.
जे फुटीर लोकं आहेत, त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की त्यांना गद्दार म्हणू नका? असा प्रश्न राऊत यांनी मुलाखतीच्या शेवटी विचारला होता. त्यावर, विश्वासघातकी बोललो ना त्यांना गद्दार कुठे बोललो? म्हणून आज विश्वासघातकी शब्द वापरलाय. त्यांचा पण मान ठेवला मी. म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाही बोललो, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. जय हिंद जय महाराष्ट्र...
भुजबळांच्या प्रश्नावरही केलं भाष्य
गेल्या अडीच वर्षात मातोश्रीवर अश्लाघ्य भाषेत बोललं गेलं, त्यावर कुणीही काही बोललं नाही याचा संदर्भ देत भुजबळांबद्दलही बोललं गेल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला, मात्र भुजबळांनी व्यवस्थित खुलासा केला आहे. स्वत: भुजबळ आणि शिवसेनाप्रमुखांची मातोश्रीत भेट झाली. तो सगळा संवाद जो काही झाला, त्याला मीही साक्षीदार होतो. तुम्ही पण होतात मला वाटतं, असे संजय राऊत यांनी उद्देशून उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं, बाळासाहेबांनी सांगितलं की, आता आपलं वैर संपले. बाळासाहेब हे उमद्या स्वभावाचे होते, अनेकवेळा त्यांनी शत्रूलाही माफ केलंय, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी आठवण स्वरुपात सांगितला.
भाजप त्रास देतंय सांगणारे हेच होते
“भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला आहे.
गद्दार शब्दावरुन शिवसेना-शिंदेगटात जुंपली
आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानाला आता शिवसेनेच्या एका रणरागिणीने प्रतिआव्हान दिले होते. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना दिले.