Join us

उद्धव ठाकरेंना मिळालं बळ! शरद पवारांनंतर देशातील आणखी दोन मोदी विरोधकांचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 4:23 PM

उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून खचून न जाता पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला असला तरी हा पूर्व नियोजित कट आहे. ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी एका गोष्टीसाठी भाग्यवान आहे...बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य दिल्लीवाले देऊ शकत नाहीत, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. तसेच आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोर्टात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही. सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. 

राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा फोन आला होता. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील फोन केला असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यात सुनावणी सुरू होत आहे. त्यावरही भावनेचा हा पेंडुलम कुणीकडे कसा झुकेल, हे कळेल. या अशा वातावरणातही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जाणारे आनंद, उत्सव आणि टीकेचे बाण या लोकांना आणखी घायाळ करतील. तेव्हा आता खरी कसोटी शिंदे शिवसेनेतील नेत्यांची आहे. काँग्रेसमध्ये राजकारणावर भाष्य करताना विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, काँग्रेसमध्ये श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. आज हे दोन शब्द शिंदेंच्या शिवसेनेसाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. 

नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य-

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर आता पुन्हा ते उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंची जिथे निर्विवाद सत्ता आहे अशा मुंबई महापालिकेत जोरदार धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी केली असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचं पुढचं लक्ष्य मुंबईतले ठाकरे गटाचे नगरसेवक आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात आणण्यासाठी खास रणनिती आखण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे आता पुन्हा एक नवीन आव्हान उभे राहणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेशरद पवार