उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:25 IST2025-04-22T16:23:35+5:302025-04-22T16:25:24+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २५ वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती. ते जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
Mumbai News: मुंबई महापालिका निवडणुकीची भाजपने जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. या निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे हे जमीन घोटाळ्यांचे बादशाह असल्याचा आरोप केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईतील गोरेगाव क्लब येथे भाजपची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्याबद्दल बोलताना शेलारांनी ठाकरे हेच सर्व जमीन घोटाळ्यांचे बादशाह असल्याचे म्हटले.
"मुंबईतील सर्व जमिनींच्या घोटाळ्यांचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत. म्हणून त्यांच्या डोक्यात जमीन आणि जमीन घोटाळे असतात", असे विधान आशिष शेलारांनी केले.
"भाजपवाले मुस्लिमांच्या जमीन घेतील आणि उद्योगपतींना देतील अशी टीका उद्धव ठाकरे करतात. मुंबईत १ चौरसफूट जागेची किंमत १ लाख रुपये आहे. माझा त्यांना सवाल आहे की, तुम्ही २५ वर्षे महापालिकेत सत्तेत होतात. मुंबईतील जमीन बिल्डरांना देण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केले.
ठाकरेंच्या शिवसेनेची शेलारांवर टीका
आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "एका आठवड्यापूर्वी एका पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन, तो झोलर... याचं उत्तर कुठे दिलंय. तुम्हाला झोलर म्हटलंय. भूमाफिया कोण आहेत, हे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील लोकांना कळायला लागलं आहे", अशी टीका पेडणेकर यांनी शेलारांवर केली.