Uddhav Thackeray: "२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, "वर्षा"तला शेवटचा दिवस?" मनसेचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:36 PM2022-06-21T17:36:01+5:302022-06-21T17:36:59+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसह आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सूरतमध्ये आहेत. तर, शिवसेनेनं गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदेंना हटवलं असून अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे. एकूणच महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलं असून अनेकजण सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते आणि विरोधक या राजकीय बंडावर भाष्य करताना शिवसेनेवर टिका करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसह आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, शरद पवार, संजय राऊत यांनीही यासंदर्भात भाष्य केलं असून सध्या थांबा आणि पाहा, असंच ते म्हणाले आहेत. दुसरीकडे भाजप समर्थक आणि शिवसेनेचे विरोधक शिवसेनेवर टिका करत आहेत. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस …की " वर्षा " तला शेवटचा दिवस ?!!
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 21, 2022
अमेय खोपकर यांनी शिंदेशाही अवतरली... असे ट्विट केले. त्यानंतर, काही वेळातच त्यांनी आणखी एक ट्वि केलं. त्यामध्ये, २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की "वर्षा" तला शेवटचा दिवस ?!!, असं टिकात्मक सूचक ट्विट खोपकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांनीही असेच ट्विट केले आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 21, 2022
वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून
आज २१ जून, हा दिवस जगभरामध्ये जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. आज सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आज १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
“नक्की काय चाललंय हेच माहित नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्वकाही परिस्थिती स्पष्ट होईल तेव्हा पाहू,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, योग्य वेळी पर्याय देऊ असं भाजपचे लोक म्हणत आहेत, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देत ही शहाणपणाची गोष्ट असल्याचं म्हटलं.