एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधून सध्या विस्तवही जात नाही आहे, अशी परिस्थिती आहे. दोन्ही नेते एकमेकांवर प्रखर भाषेत वारंवार टीका करत असतात. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राच्या राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस तरी राहतील नाहीतर मी तरी राहीन, अशा निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची चित्रफित शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रतिइशारा दिला आहे.
या चित्रफितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे ‘’माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागला तर सोडत नाही’’, असं सांगताना दिसत आहेत. दरम्यान, ही चित्रफित शेअर करताना मुंबई भाजपाने ‘’उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’’ असा सूचक इशाराही दिला आहे.
दरम्यान, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक पार पाडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यासोबत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ठाकरेंनी इशारा दिला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे.