मुंबई - सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. 'चीनची घुसखोरी आणि पाकिस्तानी गोळीबार याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर निक्रियतेचे आरोप करणारेच आज केंद्रात आणि जम्मू-कश्मीर राज्यात सत्तेत आहेत', अशी टीका उद्धव यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. 'आधी जे घडत होते तेच आताही घडत असेल तर मग कश्मीरमध्ये काय बदलले', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?जम्मू-कश्मीर गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी ‘शांत’ झाल्याचे दावे केले जात असले तरी जम्मू-कश्मीरची सीमा मात्र ‘अशांत’च असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी पाकिस्तानने या ठिकाणी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूँछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्याशिवाय मोर्टर शेलचाही मारा केला गेला. त्यात कोणी मृत वा जखमी झाले नाही. आपल्या जवानांनी पाकिस्तानी गोळीबाराला नेहमीप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिले. मात्र पाकड्यांचे शेपूट वळवळतच आहे हे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले. गेल्या वर्षभरात जम्मू-कश्मीरमधील दगडफेकीच्या घटना ९० टक्के घटल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरचे पोलीसप्रमुख एस. पी. वैद यांनी केला होता. कश्मीरमधील फुटीरवादी तसेच हुरियतच्या नेत्यांविरोधातही कारवाई करण्यात आली. त्यांच्या आर्थिक नाड्याआवळल्या गेल्या. त्याशिवाय दीडशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा हिंदुस्थानी लष्कराच्या धडक कारवाईत झाला. त्यामुळे जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली असेही दावे मधल्या काळात केले गेले. पुन्हा हिंदुस्थानी पंतप्रधानांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत सर्वांकडून दमबाजीचे इशारे-नगारे वाजविले जातच आहेत. ‘पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी. दहशतवाद्यांची आश्रयस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत,’ असे शाब्दिक क्षेपणास्त्र गेल्याच महिन्यात हिंदुस्थान आणि अमेरिकेने संयुक्तपणे पाकिस्तानवर डागले होते. मात्र तरीही पाकड्यांनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केलाच. हिंदुस्थानच्या सोडा, अमेरिकेच्या इशाऱ्यांनाही आपण भीक घालत नाही असेच पाकिस्तानने पुन्हा दाखवले. अर्थात पाकिस्तानचा हा अनुभव नवीन नाही. जम्मू-कश्मीरमधील शांततेबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून कितीही दावे केले जात असले तरी हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा अशांत आहे ही वस्तुस्थिती आहे. वर्षभरात ३०० पेक्षा जास्त वेळेस पाकड्यांनी सीमेवर गोळीबार केला आहे. त्यात जवानांसह दहापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांचाच विचार केला तर बुधवारचे शस्त्रसंधी उल्लंघन तिसऱ्यांदा झाले आहे. शुक्रवारी नौगाम सेक्टरमध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर राजौरीभागात झालेल्या गोळीबारात एक हिंदुस्थानी जवान शहीद झाला. आता पूँछ भागात केलेल्या गोळीबारात कोणतीही हानी झालेली नसली तरी सीमेवरील कुरापती कमी करण्याची पाकिस्तानची तयारी नाही हे पुन्हा स्पष्ट झाले. मुख्य म्हणजे पूँछ-रावलकोट मार्गावर चाकन-दा-बाग येथून दोन्ही देशांदरम्यान वाहतूक आणि व्यापार सुरू झाल्यावर आठवडाभरातच पाकिस्तानने हा गोळीबार केला. गेल्या जुलैमध्ये हेच घडले होते. त्यामुळे चार-पाच महिने या मार्गावरील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आता ते सुरू करण्यात आल्यावर पाकडय़ांनी पुन्हा कुरापत काढली आहे. तिथून होणारे व्यवहार सुरळीत राहू नयेत हाच त्यामागचा उद्देश आहे. चार वर्षांपूर्वी याच क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. त्यात पाच हिंदुस्थानी जवान शहीद झाले होते. त्या वेळी चीनची घुसखोरी आणि पाकिस्तानी गोळीबार याबाबत तत्कालीन यूपीए सरकारवर निक्रियतेचे आरोप करणारेच आज केंद्रात आणि जम्मू-कश्मीर राज्यात सत्तेत आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तानची नांगी ठेचल्याचेही दावे केले जात आहेत. तरीही चाकन-दा-बाग भागात पाकिस्तान गोळीबार करतो. चार महिन्यांच्या खोळंब्यानंतर तेथे सुरू झालेल्या व्यवहारांना खोडा घालण्याचा प्रयत्न करतो. आधी जे घडत होते तेच आताही घडत असेल तर मग कश्मीरमध्ये काय बदलले, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उभा राहू शकतो.