Uddhav Thackeray: 'थोडा संयम अन् धीर ठेवा आपण सगळं उघडू पण...'; मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:20 PM2021-09-05T13:20:47+5:302021-09-05T13:25:12+5:30
Uddhav Thackeray: राज्यात काही जण हे उघडा, ते उघडा अशी मागणी घेऊन बसलेत. पण मला त्यांना एक सांगणं आहे. थोडा संयम आणि धीर ठेवा.
Uddhav Thackeray: राज्यात काही जण हे उघडा, ते उघडा अशी मागणी घेऊन बसलेत. पण मला त्यांना एक सांगणं आहे. थोडा संयम आणि धीर ठेवा. कोरोना काही संपलेला नाही. कारण राजकारण आपलं होतं. पण जीव जनतेचा जातो. आपण ज्या गोष्टी सुरू करतोय त्या पुन्हा बंद कराव्या लागू नयेत याची काळजी घेऊनच निर्णय घेत आहोत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला फटकारलं आहे. राज्यात भाजपाकडून मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं केली गेली. तर मनसेकडून सण-उत्सवावरील बंदीवरुन निदर्शनं करण्यात आली. याच मुद्द्याला अनुसरुन उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केलं. ते 'माझा डॉक्टर' या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेत डॉक्टरांशी संवाद साधताना बोलत होते.
"कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ती येऊ नये अशीच आपली प्रार्थना आहे. पण ती आलीच तर ती कमी कशी करता येईल आणि घातक ठरणार नाही याची काळजी कशी घेता येईल यावर काम करायला हवं. राज्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. त्यादृष्टीनं आवश्यक अशा सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगणं आहे की कोरोना नावाचा शत्रू अजूनही संपलेला नाही. त्याविरोधातील युद्ध अजूनही सुरूच असून त्याला पूर्णपणे हद्दपार करायचं असेल तर आपण जागरुक राहायला हवं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या वर्षी सण-उत्सव काळातच कोरोना वाढला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण आणि उत्सव काळातील कोरोना वाढीच्या धोक्यावरही भाष्य केलं. "गेल्या वर्षी राज्यात सण-उत्सव काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे यावर्षी आपण गाफील राहून कसं चालेल? यावर्षी गर्दी टाळावी अशी माझी सर्व जनतेला विनंती आहे. लसीकरण झालेलं असलं तरी मास्कचा वापर करायला हवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिक्षक कुठे, कधी, कुठल्या रुपात भेटेल सांगता येत नाही
"शिक्षण दिनाच्या औचित्य आज आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनानं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. आपल्याला शिक्षक कुठे, कधी आणि कुठल्या रुपात भेटेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षामधून आपण आजही काही धडा घेतला नाही तर ते योग्य ठरणार नाही. कोरोना परिस्थितीतून आपल्याला मिळालेले धडे आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यादृष्टीनं काम करायला हवं", असंही मुख्यमंत्री म्हणाले.
डेंग्यू, टायफॉइडलाही हलक्यात घेऊ नका
ताप आणि इतर काही लक्षणं दिसू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली. त्यानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली म्हणून निश्चिंत होऊन जाऊ नका. तापाचं नेमकं कारण का आहे हे पाहायला हवं. कोरोना इतकाच डेंग्यू, टायफॉइड देखील गंभीर आहे. त्यामुळे योग्यवेळी चाचणी होऊन आजाराचं निदान होणं खूप महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.