मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा टोकावर घेतल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील अनेक परिसरात उद्धव ठाकरेंच्या अयोध्या आणि वाराणसी दौऱ्याचे पोस्टर्स लागले असून या पोस्टर्सवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. चलो अयोध्या, चलो वाराणसी असा ठळक मजकूर या पोस्टर्समध्ये दिसून येत आहे. तसेच देशाच्या राजकारणातील हे महत्वाचे पाऊल असल्याचेही या पोस्टरमध्ये म्हटले आहे.
शिवसेनेकडून 2019 ची रणनिती आखण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमक करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अयोध्या आणि वाराणसी भेटीची योजना आखली आहे. 'चलो अयोध्या, चलो वारणसी, देशाच्या राजकारणातील महत्वकांक्षी पाऊल' असा आशय शिवसेनेकडून शहरात लावलेल्या पोस्टर्सवर दिसत आहे. तसेच या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही पोस्टरमधून करण्यात आले आहे. वांद्रे परिसरात हे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी ही पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरबाजीमुळे हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे. तर अयोध्या आणि वाराणसी भेटीत उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार का ? हाही चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा..
शिवसेना 'कन्फ्यूज'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ