Join us

उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 9:43 PM

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने आज वर्धापन दिन साजरा केला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी मोठ्या सभेचं आयोजन या दिनी केलं होतं.

मुंबई - राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेवर शिंदे गटाकडून आणि भाजपच्या नेत्यांकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मोदी@९ या कार्यक्रमांतर्गत भाजपच्या लोकसभा मतदारसंघात सभा घेत आहेत. या सभांमधून ते शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आज कल्याणमध्ये मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. "खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात फडणवीस म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचं म्हटलं. 

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने आज वर्धापन दिन साजरा केला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी मोठ्या सभेचं आयोजन या दिनी केलं होतं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. तर, उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, कोणता सूर्य, मग हा सूर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही, असे म्हणत हल्लाबोल केला. तर, देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असल्याचं ठाकरेंनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ उपस्थितांना मोबाईलमधून ऐकवला. ज्यामध्ये, फडणवीसांनी मोदींच्या कामाचं कौतुक करताना, कोरोना काळात मोदींनी लस तयारी केली असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी हा व्हिडिओ स्पीकरवरुन ऐकवला अन् सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर, जर मोदींनी लस तयारी केली, मग बाकींच्यानी काय केलं, बाकी संशोधकांनी काय गवत उपटलं का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, हे असले सगळे अंधभक्त आहेत, त्यांचे गुरुही तसलेच म्हणत मोदींवरही निशाणा साधला. 

उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपची ही मंडळी म्हणजे फडणवीसांची हास्यजत्रा असल्याचे म्हटले. येथे सगळेच आवली आहेत, कुणीही लव्हली नाही. नुसतीच कावली. या सर्वांना त्या समीर चौघुलेच्या समुपदेशन केंद्रात, मानसोपचार केंद्रात दाखल करायला हवं, असे म्हणत उद्धव ठाकरेंना जोरदार निशाणा साधला. 

खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, शिवसेनेला ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेच दुकान बंद करीन पण काँग्रेससोबत जाणार नाही. पण, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला. तुम्ही निवडणुकीत भाजपसोबत मत मागितली, पण त्यांच्यासोबत गेलात. खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनादेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीकोरोनाची लस