मुंबई: आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. 'इथे निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. ही सगळी गर्दी पैसे देऊन आली नाही. 57 वर्षांची तपश्चर्या आहे. आयत्या बिळावर बसलेल्या नागोबाला समजणार नाही. भाजपचे काम झाल्यावर या नागोबाला टोपलीत घालून कुठेतरी नेऊन सोडतील, यांना कळणारही नाही,' अशी टीका ठाकरेंनी केली.
ते पुढे म्हणाले, लवकरच कोर्टाचा निकाल लागेल, मग यांना टुरीस्ट कंपनी काढाल्याशिवाय पर्याय नाही. सूरतेला गेला तर कुठे राहाल, गुवाहाटी गेला तर काय पाहाल, रेडा कुठे कापायचा, टेबलावर कुठे नाचायचं, नाचायचं असेल तर एवढे पैसे, त्यानंतर दिल्लीत मुजरा करण्यासाठी एवढे पैसे...हे गद्दार तुम्हाला निवडणुकीत भेटतील, तिकडे यांना शेकून काढायचं आहे.'
'मी उम्मेद हरलो नाहीये, हरुच शकत नाही. शिवसेनाप्रमुख आपल्याकडे पाहत आहेत, असं मला नेहमी वाटतं. या संकटाला कसं तोडून मोडून टाकायचं, हे आपल्या सैनिकांच्या फौजेला माहित आहे. हे शिवसेनाप्रमुख पाहत असतील. हे समोर आलेलं आव्हान मोडणार आणि यापुढे आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. हे आव्हान तुमच्या साथीने परतून लावल्याशिवाय राहणार नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातमी- आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका
'उद्या गद्दारदिन आहे. त्यांच्या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांनी आपलं नाव चोरलं, पक्ष चोरला, माझ्या वडिलांना चोरायला निघाले होते. आज उद्धव ठाकरेला काय किम्मत आहे, पण अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंच्या नावाचा जप करावा लागतो. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोराल, पण शिवसैनिकांच्या हृदयातील बाळासाहेब चोरू शकत नाही.'
'आजही अनेकजण जात आहेत. यामुळे शिवसेनेला धक्का बिक्का बसत नाही. शिवसेना धक्काप्रूफ आहे. जे भाडोत्री-बिकाऊ असतील, ते घेऊन जा. आजही अनेकांना त्यांचे फोन येतात आणि या म्हणतात. त्यांनी आमचं पीक कापून नेलंय, पण शेती आमच्याकडेच आहे. शिवसेनाप्रमुखांनी जे बियाणं आपल्याला दिलंय, ते बोगस बियाणं नाहीये,' असंही ठाकरे यावेळी म्हणाले.