मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमीत्त आज मुंबईत दोन मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एक कार्यक्रम राज्य सरकारतर्फे विधानभवनात आणि दुसरा शिवसेनेकडून षन्मुखानंद सभागृहात. यावेळी शिवसेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल केला.
हिंदूत्व थोतांड आहे...उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे हिंदूत्व वगैरे सगळं काही थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धुक्याची एक भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून देशावर पकड घट्ट बसावायची. काही वर्षांपूर्वी चीनला अशी परिस्थिती होती की, बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुध्दा कोणी सरकारविरोधात बोललं तरी दोन दिवसात तो माणूस अदृश्य व्हायचा. तशी घाणेरडी पोलादी पकड इकडे आणायला बघत आहेत आणि ते आपण उघड्या डोळ्याने बघत बसायचं,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
राज्य सरकारवर टीकायावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवरही टीका केली. 'खोक्यांनी गद्दार विकले जाऊ शकतात, सच्चा कार्यकर्ता विकला जाणार नाही. विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत आहे. दुपारी मला या तैलचित्राच्या अनावरणाबाबत विचारण्यात आले. त्यावर मी म्हणालो की, मी बघितलेले नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारले असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही. परंतु त्यांना योग्य तेवढा वेळ दिला आहे का, हे त्यांना विचारणे गरजेचे आहे. कारण घाईगडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचे आणि हे तुझे वडील, असे सांगायचे. हे अजिबात चालणार नाही,' या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तैलचित्रावरून नाराजी व्यक्त केली. दुसऱ्यांचे वडील चोरताना स्वतःच्या वडिलांना विसरू नका, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला.
राज्यपालांवर टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवरही टीका केली. 'महाराष्ट्रद्वेष्टा माणूस याला हाकलून दिले पाहिजे. महापुरुषांचा अपमान करणारा हा माणूस आहे. उशीरा सुचलेले शहाणपण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही गप्प बसणारे बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकतो का? ही सगळी नाटके संपवण्याची वेळ आलीय. हे सगळे दगड आहेत. भाजपा दगडाचा वापर करतेय,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.