Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 09:07 PM2022-04-20T21:07:29+5:302022-04-20T21:13:20+5:30
तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती
मुंबई - तिरुपती बालाजीच्या भक्तगणांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असं तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर उलवे इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. त्यासाठी, 10 एकर जागेस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली. तर, तिरुमला तिरुपती मंदिराचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत.
तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक भूमिका घेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करुन तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवा, असे निर्देश नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर अखेर या नवी मुंबईत प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी 10 एकर जागा अर्पण करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विश्वासू नार्वेकरांना ही संधी मिळताच, त्यांनी आता महाराष्ट्रात तिरुमला तिरुपती मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.
— Shivsena Communication (@ShivsenaComms) April 20, 2022
मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (2 एप्रिल) सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरुमला तिरुपती देवस्थानमला या मंदिरासाठी जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी आणि मंत्री अदित्य ठाकरे हे या बैठकीत उपस्थित होते. 27 फेब्रुवारी 2022 रोजी तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी जमीन वाटपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरासाठी सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिले होते. जमिनीच्या वाटपाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर सुब्बा रेड्डी यांच्यासह अतिरिक्त मुख्य अधिकारी धर्मा रेड्डी, विश्वस्त मिलिंद नार्वेकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी भेट देऊन जागेची पाहणी केली होती.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिरुपती देवस्थानाकरिता जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray जी, नगरविकास मंत्री @mieknathshinde जी यांचे मनःपूर्वक आभार.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) April 20, 2022