Uddhav Thackeray: नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 03:33 PM2022-05-01T15:33:47+5:302022-05-01T15:37:59+5:30

भोंग्याचा मुद्दा गाजलाय असं मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.

Uddhav Thackeray: Make a fuss all over the country like the ban on currency notes, Uddhav Thackeray has clearly said | Uddhav Thackeray: नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray: नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या आज औरंगाबाद येथे होणाऱ्या बहुचर्चित सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे नेतेही आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. आता, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे आणि मनसेवर थेट हल्लाबोल केला. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बोचरी टीका करत खडेबोलही सुनावले आहेत. मनसेच्या भोंगाबंदीच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरेंनी हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला.

भोंग्याचा मुद्दा गाजलाय असं मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे, तो निर्णय देशभर लागू आहे. गतआठवड्यात गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात एक बैठकही घेतली. त्यामध्ये असंच ठरलं की, जसं नोटबंदी केली, लॉकडाऊन केलं, हा निर्णय देशभर लागू केला होता. त्याचप्रमाणे भोंगाबंदीही देशभर करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भोंग्याचा चेंडू केंद्राकडे ढकलला आहे. या याचिकेतील निर्णयात केंद्र सरकार एक पार्टी होती, त्यामुळे केंद्र सरकारनेच हा निर्णय घ्यायला हवा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मी समजून घेतला. त्यानुसार, तो निर्णय सर्वधर्मीयांना लागू आहे, कोण्या एका धर्मासाठी नाही. म्हणूनच, हा निर्णय आपल्याला, सर्वधर्मीयांना पाळावा लागेल. मात्र, मला आता तो विषय गौण वाटत आहे. कारण, माझ्यापुढे अनेक प्रश्न आहेत, राज्याला पुढे न्यायचं आहे. गुंतवणूक वाढवायची आहे, थांबलेलं अर्थचक्र पुन्हा फिरवायचंय, असे म्हणत भोंग्याचा मुद्दा गौण असल्याचे उद्धव ठाकरेंनी लोकसत्ताच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना म्हटले. तसेच, भोंग्याचा विषय सर्वधर्मीयांसाठी आहे. तो अजानचा मुद्दा नसून आवाजाचा मुद्दा आहे. पण, काहींनी अजानतेपणाने हा मुद्दा उठवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात कुठेही मशिदींवरील भोंगे उतरवा असं म्हटलं नाही, असे स्पष्टीकरणही उद्धव ठाकरेंनी दिले. 

राज ठाकरेंना लगावला टोला

मुख्यमंत्री म्हणाले, अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणकोणते खेळ करताता हे लोकांनी अनुभवलं आहे.कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ तर असे खेळाडू असतात ना असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सारे काही बंद होते. आता कुठे जनजीवन रुळावर येत आहे, अशा परिस्थितीत फुकटात करमणूक पाहायची असेल तर ती का नाही पाहायची, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.  हिंदुत्वाच्या गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा विचार केला जातोय. असले भोंगेधारी पुंगीधारी खूप पाहिले आहे. त्यामुळे हिंदूंना सर्वकाही समजतं. कधीतरी आम्ही मराठी म्हणायचं आणि बाकीच्यांना हाकलून द्यायचं. ते फसल्यावर परत आम्ही हिंदू म्हणून त्यांना पुन्हा बोलवायचं, याला माकडचाळे म्हणतात, असा बोचरा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
 

Web Title: Uddhav Thackeray: Make a fuss all over the country like the ban on currency notes, Uddhav Thackeray has clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.