Join us  

Narayan Rane: उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 4:27 PM

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला.

मुंबई-

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. देशातील सर्व वृत्तपत्र संस्था डबघाईला निघाल्या आणि माध्यम समूहांना कोरोना काळात मोठा फटका बसला पण सामनानं नफा कमावला यामागचं गुपीत काय?, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इकडचे ''खोके'' 'सामना'मध्ये दाखवून व्हाइट करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे.

कोरोना काळात 'सामना'नं कमावलेले ४२ कोटी रुपये आले कुठून याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं नारायण राणे म्हणाले. "राजमुद्रा प्रिटिंग प्रेसच्या गौरी भिडे नावाच्या महिला आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय? याची विचारणा केली. सामनाचं उत्पन्न काय? आणि उद्धव ठाकरेंचं उत्पन्न काय? हे त्यांनी सांगावं. त्यानंतरच खोक्याचे आरोप करावे. कोरोनात सगळ्या कंपन्या देशोधडीला लागलेल्या असताना यांचं वृत्तपत्र नफ्यात होतं. भुजबळ दोन-अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. भुजबळांचा जो सीए आहे. त्याच सीएनं ''मातोश्री''चेही पैसे व्हाइट केले. भुजबळांनी अडीच वर्ष आत काढली आता उर्वरित अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना जेलमध्ये काढायची आहे. आम्ही सोडणार नाही. तुम्ही लोकांचे पैसे बुडवले आहेत", असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.

काहीही न करता ते संपत्तीचे मालक कसे?"उद्धव ठाकरे नेमकं करतात काय? काहीही न करता ते संपत्तीचे मालक कसे झाले?", असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. तसंच उद्धव ठाकरेंनी कधी एकातरी शिवसैनिकाला मदत केली आहे का? एकनाथ शिंदे आणि या नारायण राणेनं शिवसेना तळागळापर्यंत पोहोचवली. उद्धव ठाकरेंचं पक्ष वाढीसाठी नेमकं योगदान काय? ते नुसते आयत्या बिळावर नागोबा आहेत, असं नारायण राणे म्हणाले. 

सगळी कागदपत्रं दिल्लीला पाठवलेत"उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टीबद्दल गौरी भिडे बोलल्याच आहेत. चतुर्वेदी नावाच्या सीएनं भुजबळांप्रमाणेच ठाकरेंचेही ब्लॅकचे पैसे व्हाइट केले आहेत. यासंबंधीचे सगळी कागदपत्र दिल्लीला योग्य जागी पोहोचवली आहेत. त्यामुळे कुणाचीही सुटका होणार नाही. पाटणकरांची पण नाही आणि यांचीही सुटका नाही. दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर फक्त तमाशा केला. साहेबांनी जगात नाव केलं. पण या माणसाची अजिबात पात्रता नाही", असंही राणे म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे उद्धव ठाकरे