"मुन्नाभाईंना समजून घ्यायला शिल्लक सेनेच्या 'मामूं'ना ७ जन्म घ्यावे लागतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:22 PM2022-09-23T14:22:08+5:302022-09-23T14:29:42+5:30

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे

Uddhav Thackeray 'Mamu' will have to take 7 births to understand MNS's Munnabhai raj Thackeray | "मुन्नाभाईंना समजून घ्यायला शिल्लक सेनेच्या 'मामूं'ना ७ जन्म घ्यावे लागतील"

"मुन्नाभाईंना समजून घ्यायला शिल्लक सेनेच्या 'मामूं'ना ७ जन्म घ्यावे लागतील"

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचा मुन्नाभाई असा उल्लेख केला होता. त्यानंतर, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा मुन्नाभाई उल्लेख करता बोचरी टीका केली. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी ते दौरा करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजप, एकनाथ शिंदेंसह राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, तत्पूर्वीच मनसेचे नेते शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यानंतर आता गजानन काळे यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. शिल्लक सेनेचे 'मामू' बहुदा विसरले असावे, म्हणून त्यांना आठवण करुन देतो. शिल्लक सेनेचे छोटे नवाब आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून उभे होते. तेव्हा राज ठाकरे यांनी मनसेचा उमेदवार दिला नाही. आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. विशेष म्हणजे २०१२ ला एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ठाणे महानगरपालिकेत सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. शिल्लक सेनेंच्या मामूला, राज ठाकरेंना म्हणजेच मुन्नाभाईंना समजायला ७ जन्म घ्यावे लागतील, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही केली होती टीका

काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. हल्ली असाच एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. 

गेट वेल सून मामू 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले की, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात महात्मा गांधींचे विचार वाचून चित्रपटाचा नायक ते आत्मसात करतो, त्याप्रमाणे राज ठाकरेही लहानपणापासून बाळासाहेबांचे विचार आत्मसात करताय. उद्धव ठाकरेंना मात्र बाळासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याची टीका अमेय खोपकर यांनी केली. उद्धव ठाकरेंनाचा बाळासाहेब समजले नाहीत. तसेच लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपत देखील त्यांना समजलेला नाही. त्यामुळे तो नीट समजून घ्यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली. 

Web Title: Uddhav Thackeray 'Mamu' will have to take 7 births to understand MNS's Munnabhai raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.