मुंबई: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नैराश्याच्या भरात स्वत:च्यात शेतीमधील पिकं फावड्याने उद्ध्वस्त करणाऱ्या प्रेमसिंग चव्हाण या शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यांची ही विदारक अवस्था पाहून अनेकांचे काळीज हेलावले होते. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रेमसिंग चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांना स्मृती प्रतिष्ठानकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी प्रेमसिंग चव्हाण यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. जालना तालुक्यातील पाहेगावात राहणारे प्रेमसिंग चव्हाण हे कोबी आणि टोमॅटोची शेती करतात. तीन महिन्यापूर्वी प्रेमसिंग चव्हाण यांनी अर्ध्या एकरात कोबीची लागवड केली होती. कोबीचे पीक तयार झाल्यानंतर कोबी त्याने बाजारपेठेत विक्रीसाठी नेला. मात्र त्याच्या कोबीला अक्षरश: कवडीमोल दर मिळाला. वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने प्रेमसिंग यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी फावड्याने कोबी आणि टोमॅटोची शेतीच उद्ध्वस्त केली. प्रेमसिंग शेती उद्ध्वस्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत त्यांनी आपली व्यथा मांडली होती. पिकाला कवडीमोल भाव मिळतो. माझी व्यथा सांगून उपयोग नाही. आम्हाला कोणीच मदत करु शकत नाही. सरकार काहीच करु शकत नाही. ते फक्त मन की बात करतात. सरकार मदत करु शकत नाही. टोमॅटो सडत आहे. असे टोमॅटो कोण घेणार?, याला भाव मिळत नाही. मला काहीच कळेनासे झाले आहे, अशी हतबलता त्यांनी व्हीडिओत व्यक्त केली होती.
नैराश्याच्या भरात पिकं उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 6:43 PM