मुंबई- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत कुठल्या विषयांवर चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. राज्यात ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला फारसे यश आले नाही. त्यामुळे आगामी रणनीतीसाठी ही भेट झाली का असा प्रश्नही उपस्थित होतो. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती, उद्योजक गौतम अदानी यांच्यावरील टीका यामुळे ही भेट असावी असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात होते.
परंतु ही भेट कौटुंबिक कारणासाठी घेतल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जवळपास ४५ मिनिटे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं सांगितले जात असले तरी राज्यातील दोन दिग्गज नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा झाली नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ही भेट कौटुंबिक असून त्यात राजकीय चर्चा झाली नाही. राजकीय बैठक नसल्याने काँग्रेस नेत्यांना निमंत्रण नव्हतं असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाच्या आमदारानेही घेतली पवारांची भेट
विशेष म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. आमदार बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभेचे आमदार आहेत.