शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली कोपर्डी घटनेतील पीडितेच्या वडिलांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 10:57 PM2018-01-13T22:57:31+5:302018-01-13T23:02:41+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (13 जानेवारी) शिवसेना भवनात कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीचे वडील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी भेट घेतली.
मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (13 जानेवारी) शिवसेना भवनात कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीचे वडील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी भेट घेतली. यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे याही उपस्थित होत्या. या भेटीवेळी कोपर्डी प्रकरण उच्च न्यायालयात चालवण्यासाठी, जेष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही निवेदन करणार असल्याचं आमदार नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांनी नुकतीच आ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांना या खटल्याप्रकरणी आरोपींतर्फे दाखल करण्यात आलेल्या उच्च न्यायालयातील केस लढवण्याकरता अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागणी करिता भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी गोऱ्हे यांच्या समवेत पीडित मुलीचे वडील व ग्रामस्थ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन भेट घेऊन या विषयी सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली. चर्चेमध्ये प्रामुख्याने आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात जे अपील करण्यात आले आहे त्या अपिलाविरुद्ध केस लढण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी निवेदनद्वारे मुलीचे वडील व ग्रामस्थांनी केली. या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण चर्चा करू असे उद्धवजीं त्यांना सांगितले. तसेच गावाजवळील कुळधरण येथील प्रस्तावित पोलीस चोैकीचे कामदेखील लवकर व्हावे या कामी लक्ष वेधले.
सध्या कोपर्डी येथे फक्त इयत्ता चौथीपर्यंत शाळा असून , पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळेची गरज ग्रामस्थांना वाटते . शाळेच्या जागेसाठी महसूल व वन विभागाशी चर्चा करून जागा उपलब्ध होण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले तसेच शैक्षणिक उपक्रमांकरता येणारी कोणत्याही अडचणी पक्षातर्फे सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली.