Join us

हालचाली वेगवान, ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, आमदारांच्या अपात्रेवर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 5:36 PM

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच, आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहितीही दिली. त्यानंतर, आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करताना सरकारला १ महिन्याचा अवधी देण्यास मान्य केलंय. मात्र, जरांगे पाटलांनी काही अटीही घातल्या आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय केंद्रस्थानी असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच, आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. या दोन्ही आमदारांच्या अपात्रेवरील याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणी सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते. यावेळी, शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. 

शरद पवार यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. राज्यात भाजपाने महायुती सरकार स्थापन केले असून आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंगही फुंकलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून बंडखोर आमदारांवरील कारवाईसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरे