Shiv Sena Uddhav Thackeray Group: एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असला तरी, दुसरीकडे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मातोश्री येथे सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावे लागेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.
ज्यांना जायचे, त्यांना जाऊ द्या, एक गोष्ट लक्षात येतेय की...
मी तुम्हाला मागेच सांगितले आहे की, ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. माझ्या एक गोष्ट लक्षात येतेय की, कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतेय, मग ते उधाण रागाचे आहे, त्वेषाचे आहे, जिद्दीचे आहे, आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आता आपल्यात जे भक्तीचे उधाण येतेय, ते पाहून आता त्यांनाच धक्के बसतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, एवढे होऊनही शिवसेना का संपत नाहीये? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडेल. प्रत्येकवेळी टीका करताना त्यांना उद्धव ठाकरेंवरच बोलावे लागते. कारण त्यांना तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक-एक सहकारी फोडण्यापेक्षा एकदाच निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.