ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:25 AM2024-07-10T07:25:13+5:302024-07-10T07:25:26+5:30
उद्धव ठाकरेंकडून आपल्या आमदारांची विशेष व्यवस्था थेट परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, आमदारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषदेची रणनीती ठरविण्यात आली असून, उद्धव ठाकरेंकडून आपल्या आमदारांची विशेष व्यवस्था थेट परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले आहेत. या तीन उमेदवारांसाठी आमदारांच्या मतांचे गणित जुळवायचे आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याकडे मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांच्या मतांची गोळाबेरीज करण्यात आली असून, उर्वरित मते कशी आणायची ते ज्या-त्या पक्षाला ठरविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार उद्धवसेनेकडून रणनीती तयार करण्यात आली असून, उद्या परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उद्धवसेनेच्या १६ आमदारांना बोलावण्यात आले असून, या सर्व आमदारांची व्यवस्था याच हॉटेलमध्ये विधान परिषद निवडणूक होईपर्यंत करण्यात आली आहे.
काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून सध्या तरी अशी कोणतीही तयारी करण्यात आली नसली तरी गुरुवारपर्यंत तिन्ही पक्षांचे आमदार आयटीसीवरच दिसण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या उमेदवार आहेत. शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीची मते
शरद पवार गट १२
उद्धव सेना १६
काँग्रेस ३७
एकूण ६७
मविआला यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता
समाजवादी पार्टी २
एमआयएम २
माकप १
शेकाप १