Uddhav Thackeray: मुंबईच्या सभेत चितळेचाही समाचार, एक बाई म्हणत उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:15 PM2022-05-14T21:15:45+5:302022-05-14T21:27:02+5:30
अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्र वाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तत्पूर्वी केतकीविरुद्ध ठाण्यातील कळवा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीविरुद्ध समाज माध्यमांवर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, मुख्यमंत्र्यांनीही एक बाई शरद पवारांवर विकृत बोलली, असे म्हणत केतकी चितळेवर हल्लाबोल केला.
अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी आक्रमक झाली असून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली असून राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी तिच्या अंगावर अंडे फेकून मारल्याचीही घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाहेर घडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मुंबईतील सभेत एक बाई शरद पवारांवर बोलली, असे म्हणत केतकीच्या भाष्यावरुन नाव न घेता तिला सुनावलं.
एक बाई शरद पवारांवर काहीतरी बोलली, फार विचित्र कमेंट आहे. घरी तुझ्या आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण आहेत की नाही. संस्कार काही होतात की नाही तुमच्यावर. किती काहीही झालं तरी बाई तुझा संबंध काय, कोणावर बोलतेस, काय बोलतेस, हे तुझं वक्तव्य असेल तर तुझ्या मुलांचं काय होणार उद्या. जो सुसंस्कृतपणा आहे, तो देशातून आणि राज्यातून जात चालला आहे. या सगळ्या चित्र विचित्र गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केतकी चितळेचं नाव न घेता तिच्यावर टिका केली.
हिंदुत्वावरुन भाजपला टोला
हिंदुत्त्व म्हणजे काय धोतर वाटलं का तुम्हाला, हिंदुत्व ही नेसण्याची किंवा सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो उघड गेलो, तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही, तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र, असे म्हणत भाजपला इतिहास सांगितला.
केतकी चितळेवर शरद पवार म्हणाले
केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीनं तुमच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे, असं शरद पवारांना पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. केतकी चितळेला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीदेखील पवारांना देण्यात आली. त्यावेळी अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही, असं पवारांनी सांगितलं. केतकी चितळे नावाची व्यक्ती माहीत नाही आणि तिनं काय केलं आहे याचीदेखील मला कल्पना नाही. तिनं काय केलं हेच माहीत नसताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका सभेत कवी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ दिला. त्याबद्दल वेगळं चित्र काहींकडून मांडलं गेल्याचं पवारांनी सांगितलं.
राज ठाकरेंकडून केतकी चितळेचा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,' असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.