Join us

उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:13 AM

या लोकांचा राजकीय सोहळा होऊन जाऊद्या, नंतर आम्ही जाऊन धार्मिक उत्सव करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut ( Marathi News )  : अयोध्या येथे २४ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले आहे का, असा प्रश्न आज पत्रकारांकडून खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं सांगत संजय राऊत यांनी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

"उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला या सोहळ्याचं निमंत्रण नाही. या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण राम मंदिर उद्घाटन सोहळा हा श्रेय घेण्याचा एक भाग बनला आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान खूप मोठं आहे. थंड बासनात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे हे तिथं गेल्यामुळे पुन्हा समोर आला. मात्र ते लोक आम्हाला बोलावणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे तिथं गेल्यामुळे शिवसेनेचा जयजयकार होईल, बाळासाहेबांचा जयजयकार होईल," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसंच ज्यांचं खरंच योगदान आहे, त्यांना ते कधीच बोलावणार नाहीत. मात्र प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. ते एका पक्षाचे किंवा एका नेत्याची जहागीर नाही. त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊद्या, नंतर आम्ही जाऊन धार्मिक उत्सव करू, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

राज्य आणि केंद्रातील सरकारवरही निशाणा

सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "सर्व काही राजकीय सोईने आणि राजकीय फायद्यासाठी चाललं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केलं जातंय, विधीमंडळ अधिवेशन गुंडाळलं जातंय. सत्ताधाऱ्यांकडून संसदीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम योजनाबद्ध पद्धतीने सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्रही आपलं पाऊल पुढे टाकतोय, हे दुर्दैव आहे. देशाच्या सुरक्षेचा भाजप सरकारने खेळखंडोबा केला आहे. काल भारताच्या पाच जवानांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावले. एकीकडे संसदेत घुसखोरी होतेय, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये पाच जवान शहीद होत आहेत. काल काश्मीरमध्ये जे झालं ते मिनी पुलवामा आहे. गेल्या दोन महिन्यांत २०० हून अधिक जवान मारले गेले आहेत, मात्र या सरकारला लाज वाटत नाही. जवानांची कत्तल उघड्या डोळ्याने पाहणारे हे लोक आता राम मंदिराची घंटा वाजवायला जाणार आहेत," अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.

टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरेराम मंदिर