मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या या सरकारला पूनम महाजन यांनी टोलाही लगावला आहे.
पूनम महाजन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, " महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. आता तीन चाकी गाडी कशी चालणार, ते पाहूच. शरद पवारांमुळेच ही अनैसर्गिक आघाडी झाली आहे. या सरकारबद्दल काँग्रेसकडे 10 टक्केही बोलण्यासारखे नाही. ते फक्त दिल्लीवरून पाहत आहेत."
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.