मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरूवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवनाला रोषणाई करण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भवनासमोर नागरिकांनी पोस्टर झळकावून उद्धव ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली.
मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली.
दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यांच्यासह सेलिब्रिटींनाही हजेरी लावली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, संजय राऊत, मनोहर जोशी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्यभरातील कार्यकर्ते शिवाजी पार्कवर उपस्थित होते.