Join us  

अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 1:23 PM

अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या उद्घाटन सोहळ्याला जाणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पण 22 जानेवारीला अयोध्येत न जाता नाशिकमधील काळाराम मंदिरात सायंकाळी 6.30 वाजता दर्शनासाठी जाणार असून त्याच दिवशी 7.30 वाजता गोदावरी नदीच्या तीरी महाआरती करणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सपत्निक आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 22 जानेवारीला अयोध्येत कोणाला निमंत्रण आले. कोण जाणार आणि कोण येणार यात मला रस नाही. कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा, आनंदाचा क्षण आहे. मी काही दिवसांपूर्वी देखील विनंती केली होती की, राम मंदिराचा लोकार्पण हा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा. या कार्यक्रमाला राजकीय रंग येऊ नये. नंतर आम्हाला जेव्हा वाटेल. तेव्हा आम्ही अयोध्येला सुद्धा जाऊ. आता कोणी मान-पाणाचा विचार न करता. एक आनंदाचा क्षण आहे. तो सर्वांनीच साजरा करायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज 6 जानेवारी माँ ची जयंती आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो. आजही आम्ही अभिवादन केलं. २३ जानेवारीला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी रात्री अनंत कानेरे मैदान गोल्फक्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे 22 जानेवारीला एवढी वर्ष ज्यासाठी संघर्ष करावा लागला होता. जवळपास 25-30 वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या राम मंदिराचे 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहोत." 

याचबरोबर, नाशिकमधील काळाराम  मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम हा माझा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्या काळाराम मंदिरात आम्ही जाऊन तिथे रामाचे दर्शन घेऊ. 22 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास काळा राम मंदिरात जाऊन आणि नंतर 7.30 वाजताच्या सुमारास प्रभू श्री राम पंचवटीला काही काळ वास्तव्यास होते. हे पावित्र लक्ष्यात घेऊन त्याच दिवशी 7.30 वाजता गोदानदीच्या तिरी महाआरती सुद्धा करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्याराम मंदिरनाशिकशिवसेना